मुदखेड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा संपन्न

नांदेड,12- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज मुदखेड पंचायत समिती येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात तालुका स्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका स्तरीय विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
मा. मुख्यमंत्री व मा. ग्रामविकास मंत्री यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासनाच्या 6 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अभियानाचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत गट विकास अधिकारी शेखर देशमुख यांनी अभियान कालावधीत ग्रामपंचायतींनी कोणते उपक्रम राबवायचे तसेच त्यांचे मूल्यमापन कशा पद्धतीने होईल याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रश्नावलीनुसार उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अभियानात सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग अनिवार्य असून तालुका स्तरावर प्रथम, व्दीतीय, तृतीय तसेच दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही सांगीतले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन दत्तात्रय उपलंचवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार संताजी भाडेकर यांनी मानले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी हातमोडे, कृषी विस्तार अधिकारी घोडसे, सहायक प्रशासन अधिकारी देशमुख, विस्तार अधिकारी निलेश बंगाळे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते



