

सोनखेड (प्रतिनिधी): सोनखेड पोलिस ठाणे हद्दीतील किवळा साठवण तलाव परिसरात गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) सायंकाळी दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना सायंकाळी अंदाजे पाचच्या सुमारास घडली.
मृत मुलांमध्ये शेख बाबर शेख जफर (वय १५, रा. बळीरामपूर, नांदेड) आणि मोहम्मद रेहान मोहम्मद युसुफ (वय १६, रा. उमर कॉलनी, देगलूर नाका, नांदेड) या दोन तरुणांचा समावेश आहे. दोघेही शिक्षण घेत होते. मित्रांच्या सांगण्यावरून व परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी व फोटोशूट करण्यासाठी ते किवळा तलाव परिसरात आले होते.
मात्र, निष्पाप खेळ करीत असताना दोघांचेही पाय घसरले आणि ते साठवण तलावाच्या सांडव्याजवळील खोल पाण्यात पडले. क्षणभरात ही दुर्घटना घडल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली.
शोधमोहीम राबवताना प्रथम शेख बाबर याचा मृतदेह सापडला. मात्र, मोहम्मद रेहान याचा शोध उशिरा रात्रीपर्यंत सुरू होता. अखेर रात्री सुमारे अकराच्या सुमारास जीव रक्षक दलाने अथक प्रयत्न करून त्याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. दोन निरागस जीव पाण्यात गमावल्याने ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. गावातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवार या घटनेने हतबल झाले आहेत. पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले.



