महाराष्ट्रा

दिवाळीत पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची शक्यता; ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवाशांवर परिणाम होण्याची भीती

 

 

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवाशांची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा दिवाळीपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गाव-शहरांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आजही एसटी बस हे प्रवासाचे सर्वात मोठे व परवडणारे साधन मानले जाते. त्यामुळे जर दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, तर हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत. अनेक गावं-खेडी पुन्हा एकदा तालुका व जिल्ह्याशी तुटणार असून प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल. त्यावेळी वाढीव भाड्याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसणार आहे.

मागील संपाची आठवण अजून ताजी

तीन वर्षांपूर्वी झालेल्या संपात जवळपास महिनाभर एसटी सेवा ठप्प राहिली होती. ग्रामीण भागातील लोक प्रवासासाठी हवालदिल झाले होते. खासगी वाहनधारकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले, अनेकांना प्रवासच परवडेनासा झाला होता. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. आता जर पुन्हा संप झाला, तर त्याचा तडाखा पूर्वीपेक्षाही मोठा बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

सेवा शक्ती संघर्ष संघटनेने सरकारवर प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. संघटनेने मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात आत्मक्लेश आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

सरकारसमोर मोठे आव्हान

दिवाळी हा लोकांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण. हजारो नागरिक या काळात शहरातून आपल्या गावी प्रवास करतात. अशा वेळी एसटी सेवा बंद पडल्यास केवळ ग्रामीण महाराष्ट्रच नव्हे, तर शहरी प्रवाशांनाही मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणती भूमिका घेतात आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *