गोदावरी पुरग्रस्त भागाला खासदार रविंद्र चव्हाण यांची भेट

नांदेड शहर व परिसरात काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पकिझा नगर, बिलाल नगर, हिलाल नगर या भागांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आज खासदार रविंद्र चव्हाण यांनी या पुरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे हालहवाल जाणून घेतले.

या वेळी खासदार चव्हाण यांनी सांगितले की, पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना न्याय मिळावा व त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी ते स्वतः पुढाकार घेऊन सरकारकडे मागणी करणार आहेत. तसेच धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना माहिती द्यायला हवी होती, परंतु पूर्वसूचना न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनतेचे नुकसान झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबतही ते शासनस्तरावर पाठपुरावा करतील, असे त्यांनी आश्वासन दिले.

या दौऱ्यात नागरिकांनी खासदारांसमोर पुरामुळे झालेल्या घरांचे, दुकाने, वीज, पाणी व रस्ते यासह इतर नुकसानाची माहिती दिली. नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत, पुनर्वसन आणि पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्याची मागणी केली. खासदारांनी त्यांची मागणी ऐकून घेतली व लवकरच मदत मिळेल असा दिलासा दिला.
खासदार चव्हाण यांच्यासोबत या दौऱ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार, माजी उपमहापौर मसूद अहमद खान, माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर, परभणीचे माजी खासदार तुकाराम रिंगे पाटील, तसेच यशपाल भिंगे, बालाजी चौहान, अजीज कुरेशी, अंबादास रतोळे यांचा समावेश होता.



