पुण्यातील कारेगावात नांदेडच्या दोन भावांवर निर्दयी हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा जीवासाठी झुंजतोय

(शेख बाबा)
पुणे (शिरुर), किरकोळ वाद… पण त्यातून उफाळलेला संताप… आणि शेवटी निर्दयी खून! अशी थरकाप उडवणारी घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली असून, एका साध्या धक्काबुक्कीतून सुरु झालेला वाद अखेर जीवघेणा ठरला आहे. या घटनेत एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील मोहम्मद हाजी आणि त्याचा भाऊ सिध्दीकी मोहम्मद (रा. कारेगाव, मूळ नांदेड) यांचा ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून ओंकार वाळके व त्याच्या साथीदाराशी वाद झाला. मात्र, हा राग मनात धरून दोघांनी दुसऱ्याच दिवशी पहाटे सुमारास त्यांच्या घरात घुसून निर्दयी हल्ला केला.
लाकडी दांडके, प्लास्टिक पाईप आणि हाताने झालेल्या मारहाणीत सिध्दीकी मोहम्मद यांचा जागीच मृत्यू झाला, तर शकील मोहम्मद गंभीर जखमी झाला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पण रांजणगाव MIDC पोलिसांनी विजेच्या वेगाने कारवाई करत अवघ्या दोन तासांत आरोपी ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोन्ही रा. कारेगाव) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
सध्या जखमी मोहम्मद शकील यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने कारेगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.



