हेल्थ

पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन जनतेच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य

 

नांदेड, ४- जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पूरस्थितीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच साथीचे आजार टाळण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे घेण्यात येत आहेत.

या आरोग्य शिबिरांना दि. ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून ती ६ ऑक्टोबरपर्यंत पूरग्रस्त भागांमध्ये राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३७७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

३ ऑक्टोबर रोजी ४५ गावांमध्ये, तर ४ ऑक्टोबर रोजी १५ गावांमध्ये ही शिबिरे घेण्यात आली. ६ ऑक्टोबर रोजी आणखी ७ गावांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या शिबिरांमध्ये ३ हजार ९०० ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार देण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची विशेष तपासणी करण्यात आली.
रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, तसेच कीटकजन्य व जलजन्य आजार, पोटदुखी, ताप, उलटी, अतिसार, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांची तपासणी करून उपचार व जनजागृती करण्यात आली.

आरोग्य विभागाचे डॉक्टर, अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी ग्रामस्थांना परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याचे साठे कोरडे करणे, नाल्या वाहत्या ठेवणे आणि शुद्धीकरण केलेले पाणी वापरणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
दरम्यान, अर्धापूर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर शिबिराला आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना गावली यांनी भेट देऊन पूरग्रस्त जनतेशी संवाद साधला. त्यांनी सर्व आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्यास तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

ही शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. श्रीकांत देसाई, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *