मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन नांदेड पोलिस दलात कार्यान्वित तपास प्रक्रियेला मिळणार गती, न्यायदानात येणार पारदर्शकता

नांदेड (प्रतिनिधी): गुन्हे तपासात पुराव्यांच्या अभावामुळे अनेकदा आरोपी सुटण्याच्या घटना घडतात. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज, दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड पोलिस दलात उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग भोकर यांच्यासाठी *फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन* दाखल झाली. या व्हॅनचे उद्घाटन पोलिस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक रासायनिक विश्लेषण उपकरणे, डी.एन.ए. व रक्त नमुने तपासणीसाठी किट्स, तसेच *डिजिटल पुरावे संकलनासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी आणि प्रयोगशाळा सहाय्यक असे फॉरेन्सिक तज्ञ कर्मचारी 24 तास कार्यरत राहतील.
या सुविधेमुळे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळीच तत्काळ तपास सुरू करता येणार असून प्राथमिक निष्कर्ष मिळवणे सोपे होईल. त्यामुळे वेळेची बचत होणार असून, घटनास्थळावरील पुरावे जशास तसे सुरक्षित राहतील आणि छेडछाड होण्याची शक्यता कमी होईल.
या उपक्रमामुळे गुन्हे तपास प्रक्रियेत गती येईल, न्यायालयीन प्रक्रियेत शंका-कुशंकांना वाव राहणार नाही आणि न्यायदानात पारदर्शकता तसेच वेग वाढेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.



