महानगरपालिकेत काँग्रेसची विजयाची परंपरा कायम राहील: अब्दुल सत्तार

नांदेड: येत्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाची परंपरा कायम राहील ८१ पैकी पुन्हा एकदा ७३ हून अधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील, असे नांदेड शहराध्यक्ष आणि माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी सांगितले. आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने बसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज यांची नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
अब्दुल हाफिज यांच्या उपस्थितीत काल पाकिजा फंक्शन हॉलमध्ये नांदेड शहर काँग्रेस कमेटी ची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पक्ष निरीक्षक अब्दुल हाफिज, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, अब्दुल गफ्फार, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, माजी सभापती फारुक अली खान, काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि शहर काँग्रेस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त पक्ष निरीक्षक अब्दुल हाफिज यांचे स्वागत करण्यात आले. पक्षाचे नेते सुरेश गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी, विशेषतः दलित आणि मुस्लिम समाजात वातावरण अनुकूल आहे. पक्षाचे निरीक्षक अब्दुल हाफिज म्हणाले की, येत्या नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ते प्रदेश काँग्रेस कमेटीने दिलेल्या सूचनांचे पालन करतील आणि जास्तीत जास्त पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्या करीता प्रयत्न करणार .
शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या वर्षी लोकसभा सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत दोन्ही वेळी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना खूप कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. नांदेडची जनता यावेळीही काँग्रेस पक्षासोबत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या ८१ पैकी ७३ उमेदवार निवडून आले होते, ती परंपरा यावेळीही कायम राहील. इतर पक्षांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात येण्यास उत्सुक असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.



