परभणीतील मच्छी मार्केटमध्ये भीषण आग; तीन दुकाने जळून खाक

परभणी (प्रतिनिधी) – परभणी शहरातील जुना मोंढा परिसरात 1982 साली बांधण्यात आलेल्या मच्छी मार्केटमध्ये शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री सुमारास 11 वाजता अचानक लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी नानल पेठ पोलिस ठाण्यात अर्ज दाखल करून घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी या मार्केटची दुरवस्था आणि मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मच्छी विक्रेते कैलास मोरे, मारोती तावडे, शेख मन्नान, सुनील तावडे, सय्यद पप्पू, अर्जुन घटमळ, रमेश मोरे आणि दत्ता तावडे यांनी सांगितले की, “या मार्केटची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे मागणी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.”

तीन वर्षांपासून भाडे आकारले गेले नाही
या जागेसंदर्भात वक्फ बोर्ड आणि महानगरपालिकेमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने मागील तीन वर्षांपासून दुकानांचे दररोज एक रुपया इतके भाडे सुद्धा मनपाने आकारलेले नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रात्री दारू पिणाऱ्यांचा अड्डा
व्यापाऱ्यांनी पुढे सांगितले की, “दररोज रात्री मार्केट परिसरात दारू पिणाऱ्यांची पंगत बसते. त्यामुळे वातावरण असुरक्षित बनले आहे. यावर पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी
व्यापाऱ्यांनी मार्केट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून चोरी, आग किंवा इतर घटनांवर नियंत्रण ठेवता येईल, अशी मागणी केली आहे. मात्र महानगरपालिका व वक्फ बोर्ड दोन्ही संस्थांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.



