जिल्हा परिषदेत नशामुक्तीची सामूहिक शपथ; व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प


नांदेड, 18 – जिल्हा परिषद नांदेडच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत आज जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. अतिरिक्त प्रमुख कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.
शपथ कार्यक्रमापूर्वी व्यसनमुक्त समाज उभारण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासूनच बदलाची सुरुवात करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती वाढविण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने पुढाकार घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




