शाळेतच ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आरोपी शिक्षक इशांत लोखंडे अटकेत

नांदेडमध्ये शिक्षकी पेशाला कलंक लावणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या चिमुकलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दररोजप्रमाणे आईने मुलीला शाळेत जाण्यास सांगितलं. मात्र, चिमुकली हट्टीपणे नकार देत होती. दोन–तीन वेळा समजावूनही ती शाळेत जाण्यास तयार नव्हती. शेवटी आईने शांतपणे मुलीला विश्वासात घेतलं आणि कारण विचारलं.
मुलीचं उत्तर ऐकताच आई-वडिलांना धक्का बसला—
शाळेतील शिक्षक तिच्यावर अत्याचार करत असल्याचं मुलीने सांगितलं.

आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल
पीडित मुलगी दुसरीत शिकत होती. आरोपी शिक्षकाचे नाव इशांत लोखंडे असून तो शाळेत गणित विषय शिकवत होता. अत्याचार केल्यानंतर मुलीला धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कुटुंबियांनी तात्काळ भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाची लाट आहे.
आधीच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप
दरम्यान, नांदेड न्यायालयाने आणखी एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी माधव जानोळे याला मरेपर्यंत जन्मठेप आणि ₹50,500 दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

हा प्रकार ३ जुलै २०२३ रोजी घडला होता. आरोपीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला होता.
या प्रकरणातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली कांबळे यांनी केला.
समाजातील सवाल — शाळाच सुरक्षित नसतील तर मुलांना कुठे ठेवायचं?
या दोन गंभीर घटनांनंतर पालकांमध्ये भीती आणि संताप दिसत आहे. शिक्षकी पेशावरचा विश्वास हादरला असून आरोपींवर कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
अशा घटनांवर कोणतीही तडजोड नाही — अशी प्रतिक्रिया नागरिक आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



