गरीबीवर मात करून उभे राहिले… पण नियतीने ऐन तारुण्यातच हिरावले; कोकण पिकनिकमागील भावनिक कारण उघड


पुणे – ताम्हिणी घाटातील ५०० फूट दरीत थार jeep कोसळून सहा तरुणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरा देऊन गेला आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या या तरुणांनी कष्ट करत मोमो विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायात मिळालेल्या पहिल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठीच त्यांनी कोकण सहलीचा बेत आखला होता. मात्र, हीच सहल त्यांच्या जीवावर बेतली.
रविवारी दुपारी हा अपघात झाल्याचा अंदाज असून, वळणावर चालकाचा ताबा सुटताच थार ५०० फूट खोल दरीत कोसळली. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागली. कोकणातून परत न आल्याने त्यांच्या मित्रांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर शोधमोहीम राबवताना हा अपघात उघड झाला.
व्यवसायातून उभे राहिलेले तरुण
दुर्दैवी मृत्यू झालेल्यांमध्ये प्रथम चव्हाण (२२), पुनीत शेट्टी (२०), साहिल गोठे (२४), ओमकार कोळी (१८), शिवा माने (१९) आणि श्री कोळी (१८) यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण उत्तमनगर-कोपरे भागात ‘S.K. Momos’ या नावाने मोमो विक्रीचा व्यवसाय भागीदारीत चालवत होते. ग्राहकांची वाढती पसंती पाहून त्यांनी व्यवसाय विस्ताराचीही योजना आखली होती.
“या तरुणांनी मेहनतीने संधी शोधली होती. त्यांच्या डोळ्यांत व्यवसाय वाढवण्याचं स्वप्न होतं,” असे प्रथम चव्हाण यांचे नातेवाईक प्रकाश साळवे यांनी सांगितले.

कुणाचे वडील रिक्षाचालक, कुणी हार विकणारी आई… घरची परिस्थिती कठीण
या सहा मित्रांमध्ये कुणाचे वडील रिक्षाचालक, तर कुणाची आई हार व पूजासाहित्य विक्री करणारी. आर्थिक अडचणी असूनही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवसाय सुरू केला होता. त्यातील एका तरुणाने कमाईतूनच थार गाडी खरेदी केली होती.
एकाच वेळी सर्वांना शक्य नसल्याने या सहा जणांनी कोकण सहलीला जाण्याचा निर्णय घेतला होता. इतर काही मित्र दुकान सांभाळण्यासाठी पुण्यातच थांबले होते.
या स्वप्नाळू तरुणांच्या मृत्यूने कोंढवे–धावडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कष्टातून उभे राहिलेल्या या मित्रांच्या संघर्षकथेसह त्यांची अधुरी स्वप्ने सर्वांना पिळून टाकत आहेत.

