श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर हॉकी कप स्पर्धेचे उदघाटन
वर्ष 2026 हॉकी खेळासाठी महत्वपूर्ण : जर्मनप्रीत सिंघ

स. रविंद्रसिंघ मोदी
नांदेड दि. 20 डिसेम्बर : श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वास समर्पित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उदघाटन शनिवार, दि. 20 डिसेम्बर रोजी अंतर्राष्ट्रीय हॉकी खेळाडू सरदार जर्मनप्रीतसिंघ यांच्या हस्ते झाले. यावेळी गुरुद्वारा तखत सचखंड हजुर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा मातासाहेबचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. हरजीतसिंघ कडेवाले, हॉकी कमिटीचे प्रमुख स. गुरमीतसिंघ (डिंपल) नवाब, स. रविंद्रसिंघ बुंगाई, स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, स. गुरमीसिंघ महाजन आणी मान्यवरांची उपस्थिती होती.

सदर प्रतिनिधी सोबत बोलतांना अर्जुन अवार्ड विजेता खेळाडू सरदार जर्मनप्रीतसिंघ म्हणाला की, येणारा वर्ष 2026 हे भारतीय हॉकीसाठी महत्वपूर्ण असा राहील. येत्या वर्षी हॉकीचा विश्व चषक होणार आहे त्याची भरपूर तयारी करावी लागणार आहे. संपूर्ण वर्ष विविध स्पर्धा मध्ये सहभाग राहील व सर्व स्पर्धा खेळल्या जाणार आहे. या सोबतच पुढे ओलम्पिक स्पर्धेची तयारी आहे. ओलिंपिक मध्ये पदक मिळावा यासाठी भारतीय हॉकी खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून आहेत.

एका प्रश्नाच्या उत्तरात जर्मनप्रीतसिंघ म्हणाला, देशात सुरु असलेल्या हॉकी लीग स्पर्धा मुळे नवनवीन खेळाडू तयार होत आहेत. प्रत्येक राज्यात हॉकी खेळासाठी सुविधा उपलब्ध झाल्यास हॉकीचे चित्र आणखीन सुखद होईल.
जर्मनप्रीतसिंघ याने श्री गुरु गोबिंद सिंघजी गोल्ड आणी सिल्वर कप हॉकी स्पर्धे विषयी गौरवोदगार काढले. नांदेड शहरात मागील 52 वर्षांपासून सतत हॉकी स्पर्धा आयोजित होत आहे ही हॉकी क्षेत्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणी मला या क्षणी येथे उपस्थित राहता आले त्याबद्दल मी हॉकी आयोजन समेतिचा आभारी आहे असे तो म्हणाला.
सतत आठ दिवस चलणाऱ्या स्पर्धेचे आयोजक दुष्ट दमन क्रीडा एवं युवक मंडळाचे अध्यक्ष गुरमीत सिंघ नवाब, पदाधिकारी जितेंदरसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, संदीपसिंघ अखबारवाले, हरप्रीतसिंघ लांगरी, महेन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलो, महेन्दरसिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, विजय कुमार नन्दे यांनी सर्व अतीथींचे सत्कार केले.
आज उद्घाटनाचा सामना पंजाब पोलीस आणी साईं संभाजीनगर यांच्यात खेळला गेला. पंजाब पोलीस संघाने हा सामना 3 विरुद्ध 1 गोल अंतराने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इटावा संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत इलेवन स्टार अमरावती संघाचा 3 विरुद्ध 1 गोल अंतराने पराभव केला.



