शिक्षण

गुणवत्तेचा नवा आदर्श: आष्टूरची जिल्हा परिषद हायस्कूल ठरतेय विद्यार्थ्यांची पसंती

 

 

नांदेड, २६- लोहा तालुक्यातील आष्टूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल आज गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सर्वांगीण विकासामुळे नावारूपाला आले आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकवून ठेवण्यासाठी व त्यांचा बौद्धिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास घडवण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद ठरत आहेत.

या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. सध्या शाळेत ४१५ विद्यार्थी शिक्षण घेत असून चालू शैक्षणिक वर्षात तब्बल १३० विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढ ही येथील शिक्षकांच्या प्रयत्नांची साक्ष देणारी आहे. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढावे यासाठी दररोज पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न फळ्यावर लिहिले जातात तसेच मासिक व वार्षिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पुस्तकाशी नाते जोडले जाते. बोला तुम्ही- बक्षीस देतो आम्ही, भाषण स्पर्धा, बोधकथा सादरीकरण अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलू लागले आहेत. शाळेत भव्य विज्ञान प्रयोगशाळा, रोबोटिक लॅब, इलेक्ट्रॉनिक प्रयोग सुविधा, आयसीटी संगणक लॅब तसेच वर्गखोल्यांमध्ये डिजिटल बोर्ड उपलब्ध आहेत. प्रयोगांद्वारे शिकण्यावर भर दिला जात असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान आत्मसात करत आहेत.

शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व आकर्षक असून सर्व वर्गखोल्यांमध्ये कचराकुंडी, ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबिन, झाडू-सुपलीची व्यवस्था आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा, ८ सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच मोठे क्रीडांगण उपलब्ध आहे. पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवत शाळेत १२० वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले असून त्यासाठी ड्रिप सिंचन व्यवस्था आहे. याशिवाय शाळेत किचन गार्डन असून वांगी, मिरची, टोमॅटो यांसारख्या भाजीपाल्याचा उपयोग मध्यान्ह भोजनासाठी केला जातो. विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक औषधींचे महत्त्व समजावे यासाठी औषधी उद्यान विकसित करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून नवोदय, एनएमएमएस, शिष्यवृत्ती, श्रेया परीक्षा यासारख्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते. क्रीडा क्षेत्रातही येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत यश संपादन केले आहे. महावाचन चळवळ, सुंदर हस्ताक्षर, आनंदी शनिवार, गोष्टींचा शनिवार, दप्तराविना शाळा, शास्त्रज्ञ व संशोधन विषयावर माहिती संकलन अशा उपक्रमांमुळे येथील विद्यार्थी हुशार, जिज्ञासू, हजरजबाबी आणि सुसंस्कृत घडत आहेत.

गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, विस्तार अधिकारी डी. आर. शिंदे व व्ही. आर. आचने यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी टोम्पे, सहशिक्षक वैद्य एस. एस., जंगापल्ले बी. एम., लुंगारे व्ही. जी., शिंदे जी. एस., मुल्ला ए. एम., लहूबंदी ताईबाई, निर्मला बोराडे, घोरपडे बी. एस., काडवदे एस. व्ही. वाघमारे आनंदा, दीपिका बाबर, श्रीमती गुंजीटे जी. एस., एन.जी. स्वामी, एन.एम. कावळे हे अहोरात्र परिश्रम घेत असून पालकांशी सातत्याने संवाद साधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजना, स्वच्छ माझी शाळा अभियान तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये शाळेचा सक्रिय सहभाग आहे. या शाळेने गुणवत्तेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून लोहा तालुक्यातील आष्‍टूरची जिल्हा परिषद हायस्कूल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *