अवैध तलवार बाळगून सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणाऱ्या आरोपींना अटक, २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग करणाऱ्या आरोपींवर पोलीसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शोध पथकाने तीन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत दोन तलवारी व तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवि चंद्रकांत बुक्तरे (वय २२, व्यवसाय मजुरी, रा. कल्याणनगर, नांदेड), रविकीरण गौतम कांबळे (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. कल्याणनगर, नांदेड),
शुभम विशाल गायकवाड (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. कल्याणनगर, नांदेड)
यांचा समावेश असून, त्यांच्यासोबत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकेही असल्याची माहिती आहे.
पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचा स्टाफ कॅनॉल रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना जय भवानी चौक, कल्याणनगर येथे वरील आरोपी सार्वजनिक ठिकाणी तलवारी बाळगून आपसात मारामारी करत असल्याचे आढळून आले.
तत्काळ कारवाई करत गुन्हे शोध पथकाने आरोपींच्या ताब्यातील दोन तलवारी व तीन मोटारसायकली असा एकूण २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे करत आहेत.



