ई-केवायसी न केल्याने लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा फटका
67 लाख महिला योजनेतून अपात्र, लाभार्थी यादीत मोठी कपात

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे. मात्र पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनीही लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने योजनेची कडक तपासणी सुरू केली आहे.
या तपासणीअंतर्गत सरकारने ई-केवायसी सक्तीची केली होती. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांसाठी कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नाही.
सरकारकडून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ई-केवायसी वेळेत पूर्ण न केल्यामुळे तब्बल 67 लाख महिला आता योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. या महिलांची नावे थेट लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 1 कोटी 80 लाख महिलांनीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांना योजनेचा लाभ पुढेही नियमितपणे मिळत राहणार आहे. मात्र उशीर करणाऱ्या महिलांसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.



