नांदेड : वाघाळा शहर महानगरपालिका शाळा क्रमांक 9, किल्ला येथे अभिनव शैक्षणिक उपक्रम


नांदेड येथील वाघाळा शहर महानगरपालिका शाळा क्रमांक 9, किल्ला येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, वाचनाची सवय लावणे तसेच आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने एक सर्वसमावेशक व प्रेरणादायी शैक्षणिक योजना सादर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 100 गुणांची मानक लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व न्याय्य पद्धतीने घेऊन, निकालानंतर गुणवत्तेच्या आधारे पाच गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
योजनेच्या पुढील टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नांदेड ते हैदराबाद असा विमान प्रवास घडवून आणला जाणार आहे. या शैक्षणिक सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक व सामाजिक वातावरणाची ओळख करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती कशी साधता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण देणे हा आहे. या प्रवासादरम्यान विविध शैक्षणिक स्थळांना भेटी व मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
या योजनेच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी श्री. नागराज बन्सोडे तसेच विशेष शिक्षक श्री. संदीप लबडे यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी योजनेची माहिती घेतली, शैक्षणिक उपक्रमांचे निरीक्षण केले आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून मेहनत, शिस्त आणि मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश दिला.
शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते हा उपक्रम विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास उपयुक्त ठरणार असून, शासकीय शाळांमधील नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी शिक्षणाची एक आदर्श उदाहरण ठरेल. संबंधित अधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यानंतर या योजनेची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी आशा शाळा प्रशासनाने व्यक्त केली आहे.



