अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर भाग्यनगर पोलिसांची कारवाई; ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड शहरात सुरू असलेल्या हिंद दि चादर या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीस बंदी घातली असतानाही अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख १० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एजाज खॉन जफर खॉन (वय ५०, व्यवसाय मजुरी, रा. सुंदर नगर, नांदेड) व नितीन किशन गायकवाड (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. प्रभात नगर, नांदेड) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जप्त मुद्देमालामध्ये देशी भिंगरी दारूच्या ३०२ सिलबंद बाटल्या (किंमत २०,१६० रुपये) तसेच वाहतुकीसाठी वापरलेला मोंट्रा कंपनीचा इलेक्ट्रिक ऑटो (किंमत ३,९०,००० रुपये) असा एकूण ४,१०,१६० रुपयांचा माल समाविष्ट आहे.
नांदेड शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजता, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्कशॉप कॉर्नर, सिंचन भवन समोर सार्वजनिक रस्त्यावर गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पो. उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, हनमंत शिंदे व त्यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. कॉ. नागनाथ चापके करीत आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.



