खडकपूरा ते बस स्थानक मुख्य मार्गावरील धोकादायक वळण अपघातांना खुले आमंत्रण

नांदेड: (मुनवर खान) दि. 25 जानेवारी 26 खडकपूरा येथून मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मिल कॉर्नर परिसरात असलेली पिण्याच्या पाण्याच्या वॉलची भिंत वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. या ठिकाणी रस्त्याला तीव्र वळण असून त्याच वळणाच्या टोकाला थेट भिंत उभी असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सदर मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने चारचाकी वाहने, दुचाकीस्वार, ऑटो रिक्षा तसेच पादचारी ये-जा करतात. रस्ता यामुळे वाहनचालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होत आहे. अनेक वेळा अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना धडक बसण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने तसेच धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टर किंवा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे हे वळण अधिकच जीवघेणे ठरत आहे. अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने वाहन थेट भिंतीवर आदळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी येथे किरकोळ अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक, दुकानदार आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप होत आहे. या ठिकाणी तातडीने दिशादर्शक व इशारा देणारे फलक, रिफ्लेक्टर बसवणे तसेच आवश्यकतेनुसार संरक्षक मागणी जोर धरत आहे.
कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी व त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



