ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; 6 ट्रॅक्टर व 2 दुचाकी जप्त एकूण 17.60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड जिल्ह्यात ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठी कारवाई करत ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईत 6 ट्रॅक्टर व 2 मोटारसायकली असा एकूण ₹17,60,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.
दि. 29 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुनिल सिंगणापूरे हा आपल्या साथीदारांसह चोरीचा ट्रॅक्टर विक्रीसाठी भोकर फाटा येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेतले.
अटक आरोपी: सुनिल मारोती सिंगणापूरे (वय 31, रा. सिंधी, ता. उमरी)
उकंडी उर्फ बालाजी संभाजी पवार (वय 37, रा. रुई, ता. हदगाव)
बालाजी किशन गळाफोडे (वय 43, रा. बाबुळगाव, जि. नांदेड)
ओमकार अनिल पवार (वय 19, रा. पाथरड, ता. हदगाव)
मारोती उर्फ बजरंग पांडुरंग तेलंग (वय 32, रा. रुई, ता. नायगाव)
त्तम धनराज राठोड (वय 48, रा. मदनापूर, ता. किनवट)
फरार आरोपी: सचिन तुळशीराम शिंदे (सिंधी, ता. उमरी), मधुकर किशन गळाफोडे (बाबुळगाव) आणि शिवाजी बबन गडमवार (रा. वसमत, सध्या राहुल नगर, परभणी).
चौकशीत आरोपींनी मागील महिनाभरात उमरी, नायगाव, अर्धापूर व भोकर तालुक्यातील विविध गावांमधून 6 ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले ट्रॅक्टर दिग्रस–देगाव मार्गावरील लोणार नदीकाठी लपवून ठेवले होते. पोलिसांनी पंचासमक्ष तेथे जाऊन जॉन डियर कंपनीचे 5 व स्वराज कंपनीचा 1 ट्रॅक्टर, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली जप्त केल्या.
अभिलेख तपासणीमध्ये अर्धापूर, नायगाव, भोकर व उमरी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.



