नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई — दरोड्याच्या तयारीतील 4 आरोपी ताब्यात

नांदेड: मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून तीन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हे प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की पांगरी शिवार, कॅनाललगत छोट्या पुलाजवळ काही इसम संशयास्पदरीत्या थांबले आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संबंधित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना ताब्यात घेतले, तर तीन जण फरार झाले.
ताब्यात घेतलेले आरोपी : शेख आयान शेख मुजीब (वय 19) – रा. जवाहरनगर, तुप्पा, नांदेड, महेफुज शेख सलीम (वय 21) – रा. म्हाडा कॉलनी, नवीन कौठा, नांदेड, शुभम शिवाजी जाधव (वय 27) – रा. धुमाळवाडी, असरजन, नांदेड
सुजित सूर्यकांत चव्हाण (वय 24) – रा. काळेश्वरनगर, विष्णुपुरी, नांदेड
जप्त मुद्देमाल : आरोपींची झडती घेतली असता पोलिसांना दरोड्यासाठी वापरता येईल असा मुद्देमाल आढळून आला. यात लोखंडी सिल्व्हर रंगाची पिस्टल
एक मॅगझीन, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी खंजर, तीन मोबाईल, मिरची पूड, लोखंडी पाईप, नायलॉन दोरी, वेळूची काठी असा एकूण ₹1,53,600/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे करीत आहेत.



