” सिकलसेल ॲनिमिया अभियानाची ” प्रभावीपणे अंमलबजावणी करा- सहसंचालक डॉ. रामजी आडकेकर यांचे नांदेडमध्ये मार्गदर्शन

नांदेड : जिल्ह्यातील ” अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान ” यशस्वी करण्यासाठी आणि आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य सेवा मुंबईचे सहसंचालक डॉ. रामजी आडकेकर यांनी आज नांदेड जिल्ह्याचा विशेष दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अभियानाच्या स्वरूपाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सिकलसेल अभियानावर विशेष भर माननीय आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. त्यांच्या सूचनेनुसार सिकलसेल ॲनिमिया अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश डॉ. आडकेकर यांनी दिले. या आजाराचे गांभीर्य ओळखून प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे, वेळेवर तपासणी आणि उपचार करणे यावर त्यांनी भर दिला. “हे अभियान केवळ सरकारी उपक्रम न राहता ती एक चळवळ व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सर्वंकष आढावा
बैठकीमध्ये सिकलसेलसह इतरही महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
– आरबीएसके (RBSK): मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी तपासणी आणि अचूक नियोजन करणे.
– हत्तीरोग : हत्तीरोग निर्मूलनांतर्गत रुग्ण शोधणे व शस्त्रक्रियांचे नियोजन करणे.
– कुष्ठरोग- कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबवणे.
– क्षयरोग (TB): कार्यक्रमांतर्गत फूड बास्केट वितरणावर विशेष भर देणे
– एनसीडी (NCD): असंसर्गजन्य आजारांसाठी (NCD) विशेष कॅम्प आयोजित करणे आणि सातत्याने मॉनिटरिंग करणे.
– आरसीएच शिबिर: माता व बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे.
दुर्गम व आदिवासी भागात प्रत्यक्ष भेट
केवळ बैठकीपुरते मर्यादित न राहता, डॉ. अडकिकर यांनी जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी माहूर भागांना प्रत्यक्ष भेट दिली. तिथे कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करताना घ्यावयाची काळजी व नियोजनाबाबत मोलाच्या सूचना दिल्या.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, क्षयरोग अधिकारी डॉ.सतीश कोपुरवाड, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. शेख बालन, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.अमृत चव्हाण, डॉ. पवार, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सिकलसेल कॉर्डिनेटर आणि अधिकारी, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



