नांदेडमध्ये 199 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून सुरू; 14,682 अर्ज प्राप्त

नांदेड प्रतिनिधी / पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आस्थापनेवरील 199 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून अधिकृतरित्या सुरू होणार आहे. या भरतीसाठी एकूण 14,682 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्यात येणार आहे. भरतीची मैदानी व शारीरिक चाचणी नांदेड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
बंदोबस्तासाठी मोठी यंत्रणा तैनात
भरती प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत:
1 पोलीस अधीक्षक
2 अपर पोलीस अधीक्षक
5 उपविभागीय पोलीस अधिकारी
60 पोलीस अधिकारी
250 पोलीस अंमलदार
चाचणीचे स्वरूप मैदानी व शारीरिक चाचणी 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होईल. त्यामध्ये पुढील घटकांचा समावेश असेल:
100 मीटर धावणे
1600 मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी 800 मीटर)
गोळाफेक
ही शारीरिक परीक्षा 50 गुणांची असेल. त्यानंतर पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी:
R.F.I.D. तंत्रज्ञान
बायोमेट्रिक प्रणाली
ऑटो फोटो कॅप्चर तंत्रज्ञान
CCTV देखरेख
यांच्या सहाय्याने घेण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि कामगिरी अचूक नोंदवता येणार आहे.
कडक देखरेख भरतीदरम्यान गैरव्यवहार टाळण्यासाठी:
100 CCTV कॅमेरे
ड्रोन कॅमेरे
गोपनीय शाखेचे साध्या वेशातील अंमलदार
यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाचे आवाहन उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी किंवा मध्यस्थांच्या भूलथापा, आश्वासने किंवा पैशांच्या मागण्यांना बळी पडू नये. अशा प्रकारची मागणी झाल्यास तात्काळ नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक टप्प्याटप्प्याने अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशाद्वारे जाहीर केले जाणार आहे.



