नांदेडमध्ये दिव्यांगाला मारहाण; आरोपीवर RPWD कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड शहरातील सांगवी प्रभाग क्रमांक 3 येथे एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीवर Rights of Persons with Disabilities Act, 2016 (आरपीडब्ल्यूडी ॲक्ट 2016) मधील कलम 92 अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकल दिव्यांग संघटना, नांदेडचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर Shiv Senaच्या सर्व आमदारांच्या घरासमोर शेकडो दिव्यांगांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.
राहुल साळवे यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत. आरपीडब्ल्यूडी ॲक्ट 2016 च्या कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्तींना त्रास देणे, मारहाण करणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा व दंडाची तरतूद आहे.
या घटनेमुळे दिव्यांग बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तपास सुरू केला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



