Godavari River नदीपात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 2.63 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध रेती उपशावर मोठी कारवाई करत गोदावरी नदीपात्रातील पाच ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत तब्बल 2,63,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची नावे करण सोनटक्के, शहाजी सोनटक्के, छगन बुकतरे (सर्व रा. ब्राम्हणवाडा)
गजानन म्हस्के (रा. नागापूर) तसेच 7 अनोळखी इसमांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 5 मोठ्या लोखंडी बोटी – प्रत्येकी 30 लाख रुपये (एकूण 1,50,00,000 रुपये), 5 मध्यम फायबर बोटी (इंजिनसह) – प्रत्येकी 15 लाख रुपये (एकूण 75,00,000 रुपये), अंदाजे 85 ब्रास रेती – 4,25,000 रुपये, 3 इंजिन – 9,00,000 रुपये, 50 तराफे – 25,00,000 रुपये एकूण मुद्देमाल – 2,63,25,000 रुपये
Avinash Kumar, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज (रेती) उपसा व वाहतुकीवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता गुप्त माहितीच्या आधारे मौजे वांगी, इंजेगाव, नागापूर, सिद्धनाथ व पुणेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात सलग 10 तास (दुपारी 2.30 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत) पाच ठिकाणी छापे टाकले.
छाप्यामध्ये बोटी, इंजिन व तराफ्यांच्या साहाय्याने रेती उपसा करणारे सात अनोळखी आरोपी पोलिसांना पाहून पळून गेले. घटनास्थळी मिळालेला मुद्देमाल हा वरील नमूद आरोपींचा असल्याचे निष्पन्न झाले.
नदीपात्रातील बोटी, इंजिन व तराफे हलविणे शक्य नसल्याने पंचासमक्ष हायड्रोजन गॅस कटरच्या साहाय्याने ते कापून, जाळून व बुडवून नष्ट करण्यात आले, तर नदीकिनारी साठवलेली रेती जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
सदर प्रकरणी एकूण 11 आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 303(2), 3(5), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 37 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



