नांदेडमध्ये मस्जिद युनूसतर्फे भव्य इफ्तार समारंभ रमजाननिमित्त सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश

नांदेड. (प्रतिनिधी) दि.०३- नांदेड येथे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मस्जिद युनूसच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील कासिम वसीम बाबू सेठ कार्यालयात भव्य इफ्तार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजात ऐक्य, सलोखा आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार समारंभाला विविध धर्मीय धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीय मान्यवरांनी एकत्र येऊन बंधुभावाचे दर्शन घडवले.
इफ्तारची घोषणा होताच उपस्थित सर्वांनी एकमेकांना खजूर भरवून उपवास सोडला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी आयोजकांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात शांतता व सामाजिक ऐक्य अधिक बळकट होते, असे मत व्यक्त केले. त्यांनी इफ्तार समारंभाचे मुख्य आयोजक अॅड. मोहम्मद कासिम वसीम बाबू सेठ यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा मौलाना साद साहेब नदवी व मुफ्ती अयुब साहेब कासमी यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. विविध धर्मीय प्रतिनिधींनी आपले विचार मांडत रमजान महिन्याच्या पावित्र्याबरोबरच मानवतेचा संदेश अधोरेखित केला.
या इफ्तार समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी दिवंगत उस्मान सेठ यांच्या कुटुंबीयांसह अॅड. मोहम्मद कासिम वसीम बाबू सेठ, अॅड. मोहम्मद युनूस अवेज, अॅड. तल्हा, तसेच विविध सामाजिक संघटनांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमात पोलीस विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी, विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभामुळे नांदेड शहरात सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा सकारात्मक संदेश पसरला.



