ज्ञान माता विद्या विहार येथील शारीरिक शिक्षकांची एनसीसीमध्ये सेकंड ऑफिसरपदी नियुक्ती

नांदेड, दि. ४ : ज्ञान माता विद्या विहार शाळेतील शारीरिक शिक्षक विष्णू नरसिंगराव शिंदे यांची एनसीसीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड अंतर्गत ही पदोन्नती देण्यात आली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
भारत सरकार व एनसीसीच्या सुधारित नियमावलीनुसार ५२ महाराष्ट्र बटालियनमधील सर्व एनसीसी शिक्षकांना पदोन्नती देण्यात येत आहे. त्यानुसार ज्ञान माता विद्या विहार, कामठा रोड, नांदेड येथील थर्ड ऑफिसर विष्णू शिंदे यांची सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नती झाली आहे.
या प्रसंगी बटालियनतर्फे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिलीप रेड्डी यांनी त्यांच्या खांद्यावर चांदणी रँक लावून सन्मानित केले. शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात सेकंड ऑफिसर विष्णू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
विष्णू शिंदे हे मागील १८ वर्षांपासून बास्केटबॉल खेळाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे प्रशासकीय सहकार्य व कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे हे यश संपादन करता आले, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून समाज व राष्ट्रकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या एनसीसी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल शाळेचे प्राचार्य फादर इग्नाथी, उपप्राचार्य फा. अॅन्सन, प्रशासकीय अधिकारी फा. आनंद, सिस्टर्स, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.



