रेल्वे स्थानकांवर आरपीएफची कारवाई : चोरीचा प्रयत्न फसला, दोन जण रंगेहात पकडले

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा मोहिमांअंतर्गत आरपीएफ व जीआरपीने विविध ठिकाणी कारवाया करत प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.
08 मार्च 2026 रोजी परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 02 वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संबंधित आरोपीला पुढील कारवाईसाठी जीआरपी परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत 07 मार्च 2026 रोजी अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे सिग्नलिंग केबल चोरीची घटना टळली. प्लॅटफॉर्म क्रमांक 06 जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 10 मीटर सिग्नलिंग केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींना रेल्वे संपत्ती (बेकायदेशीर ताबा) अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 08 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी कर्मचाऱ्यांनी घरातून पळून जाऊन रेल्वेत चढलेल्या 17 वर्षीय मुलाची सुटका केली. समुपदेशनानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे करण्यात आले.
या यशस्वी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे संपत्तीचे संरक्षण आणि सुरक्षित रेल्वे वातावरण निर्माण करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांची सततची सतर्कता व बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे दिसून येते.



