मुदखेड पोलिस व महसूल पथकाची संयुक्त कारवाई : अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांचा 80 लाखांचा मुद्देमाल नष्ट

मुदखेड : अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी मुदखेड पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 80,00,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (नांदेड) यांनी “ऑपरेशन फ्लश आउट” अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध रेतीची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. 11 मार्च 2026 रोजी मुदखेड पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम माळकौठा येथील गोदावरी नदीपात्रात हॉपर व इंजिन बोटीच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करीत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. मात्र पोलीस पथक आल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्या ठिकाणी अवैध रेती उपशासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे : तीन हॉपर व त्यासोबत तीन इंजिन बोट – किंमत अंदाजे 75,00,000 रुपये एक इंजिन बोट – किंमत अंदाजे 5,00,000 रुपये
असा एकूण 80,00,000 रुपयांचा मुद्देमाल महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जप्त केला. साहित्य अवजड असल्यामुळे ते जिलेटिनच्या सहाय्याने घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
आरोपी : विनोद पाटील उबाळे (वय 30) रा. मारतळा, ता. लोहा, विलास पाटील भरकडे (वय 35), गजु पाटील हातणे (वय 28), सतीश भरकडे (वय 32) रा. कौडगाव, ता. लोहा
या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



