नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई : 36 जिवंत काडतुसे जप्त, दोन आरोपी अटकेत

नांदेड : अवैध शस्त्रसाठा व दारुगोळा बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत नांदेड ग्रामीण पोलिसांनी 36 जिवंत काडतुसे जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (नांदेड) यांनी जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम झरी खदान परिसरात अवैध शस्त्रास्त्र व दारुगोळ्याच्या खरेदी-विक्रीसाठी येणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात शौनक गुलाब शिंदे (वय 19, रा. ए.व्ही.डब्ल्यू. अपार्टमेंट सहयोग कॅम्पस, विष्णुपुरी नांदेड) व जावेद रहेमत शेख (वय 20, रा. जामा मस्जिदजवळ, विष्णुपुरी नांदेड) हे दोन आरोपी ताब्यात मिळून आले, तर आनंद उर्फ चिन्नू सरदार यादव (वय 24, रा. वजिराबाद नांदेड) हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता पितळ व तांबा धातूचे 36 जिवंत काडतुसे (राऊंड) मिळून आले. प्रत्येक काडतुसाची किंमत अंदाजे 3,000 रुपये असून त्यावर HPM PPU 32 AUTO असे कोरलेले आहे. असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदर काडतुसे आरोपींनी कुठून आणली, कोणाला विकण्याचा त्यांचा उद्देश होता तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.



