ईदच्या भेटीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

परभणी: ईदच्या भेटीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर येथे घडली आहे. घोडके कन्स्ट्रक्शन समोर ट्रॅव्हल्स आणि डिझायर कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात एक महिला, एक लहान बालक तसेच कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत महिला व बालक हे वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून ते ईदच्या भेटीसाठी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ईदच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली आहे.



