अहमदपूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १६ जणांवर कारवाई, सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (जि. लातूर) : अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने अहमदपूर तालुक्यात धाड टाकून जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत १६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ५.८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाला मौजे काजळ हिप्परगा येथील ‘विसावा बार’च्या दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार २५ एप्रिल २०२६ रोजी छापा टाकण्यात आला. छाप्यात ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळताना १६ आरोपी आढळून आले.
पोलिसांनी आरोपींकडून १,४४,७५० रुपयांची रोकड, १,०३,००० रुपयांचे १४ मोबाईल तसेच ३,४०,००० रुपयांच्या ६ मोटारसायकली असा एकूण ५,८७,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गु.र. नं. २३३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
‘खबर’ हेल्पलाइनद्वारे माहिती देण्याचे आवाहन
परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.



