अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची मोहीम; दुसऱ्याच दिवशी २५ गुन्हे, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला दुसऱ्याच दिवशी मोठे यश मिळाले असून, विविध प्रकरणांमध्ये २५ गुन्हे दाखल करून २८ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान तब्बल १६ लाख ५२ हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ तसेच घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १० इसमांविरुद्ध कारवाई करून ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध दारू विक्री प्रकरणात १२ आरोपींविरुद्ध १२ गुन्हे दाखल करून १ लाख २० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याशिवाय अंमली पदार्थविरोधी कारवाईत सुमारे २ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शस्त्र अधिनियम, कोटपा तसेच इतर कायद्यांखाली दिवसभरात एकूण २५ कारवाया करण्यात आल्या.
दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या हेल्पलाइनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी याचा मोठा उपयोग होत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.



