ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई अवैध हत्यार साठ्यावर छापा; 43 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅक डाऊन” अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध हत्यार साठ्यावर मोठी छापा कारवाई करत तब्बल 43 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 4 हजार 796 हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे अभिजीत गिरीधर सातपुते (रा. बळीरामपूर) व जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी (रा. अबचलनगर, नांदेड) अशी आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मोठ्या व छोट्या तलवारी, विविध प्रकारचे खंजर, गुप्त्या, फोल्डिंग खंजर, कुकरी, नकल खंजर यांसह इतर साहित्याचा समावेश आहे. या सर्व हत्यारांची अंदाजे किंमत 43 लाख 48 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी “ऑपरेशन क्रॅक डाऊन” अंतर्गत अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने 6 मे 2026 रोजी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबविले.
दरम्यान, रात्री सुमारे 11.15 वाजण्याच्या सुमारास बळीरामपूर येथे एक संशयित इसम कमरेला तलवार व खंजर बाळगून फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिजीत गिरीधर सातपुते असे सांगितले. तसेच संबंधित तलवार व खंजर गुरुरामदास नगर, नांदेड येथून विकत घेतल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी पुढील तपास करत मोठ्या प्रमाणात अवैध हत्यारांचा साठा जप्त केला. या प्रकरणी पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करीत आहेत.



