पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाकडून किनवट येथे जुगार अड्ड्यावर छापा
अवैध व्यवसायविरोधी मोहिमेत १०३ गुन्हे दाखल; १२६ जणांविरुद्ध कारवाई, ५३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. १७ मे: नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत किनवट तालुक्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस उप महानिरीक्षकांच्या अधिपत्याखालील विशेष पथकाने किनवट पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर, गोकुंदा परिसरात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह ३ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ या कालावधीत अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेच्या १६ व्या दिवशी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या.
यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई करून १ लाख ८ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका-जुगार खेळणारे व खेळविणारे ३३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ११ लाख ८६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्रीविरोधातही पोलिसांनी मोठी मोहीम राबवत ७९ जणांविरुद्ध ७८ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ८ लाख ४ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करून ३० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय शस्त्र अधिनियमान्वये ३, कोटपा कायद्यांतर्गत ६, तसेच इतर विविध अधिनियमांनुसार कारवाया करून एकूण १०३ गुन्ह्यांमध्ये १२६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणांमधून ५३ लाख ९३ हजार ११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
‘खबर’ हेल्पलाइनला नागरिकांचा प्रतिसाद
अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे थेट पोलिसांना देता येणार आहे.
शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.



