नवघाट पुलावरील दिशादर्शक फलक मुख्य रस्त्यावरच; अपघाताची भीती वाढली प्रशासनाचे दुर्लक्ष,

नांदेड | प्रतिनिधी – सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शहरासह परिसरात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे, होर्डिंग्ज तसेच विविध सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले होते. याच वादळादरम्यान नवघाट पुलावरील दिशामार्ग दर्शविणारा मोठा फलक कोसळून थेट मुख्य रस्त्यावर पडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्यावर अचानक फलक कोसळल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत संबंधित यंत्रणांची वाट न पाहता स्वतःच हा फलक रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी प्रशासनाकडून यानंतर कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, घटना घडून तब्बल १५ दिवस उलटूनही सदर दिशादर्शक फलक अजूनही मुख्य रस्त्यालगतच पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिकांच्या मते, रस्त्याच्या बाजूला पडून असलेला हा मोठा लोखंडी फलक रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरू शकतो. विशेषतः अंधारात किंवा पावसाळी वातावरणात दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची तीव्रता अधिक असू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, नवघाट परिसरात दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि कामानिमित्त प्रवास करणारे वाहनचालक ये-जा करतात. त्यामुळे दिशादर्शक फलक तातडीने हटवून परिसर सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे. मात्र, आतापर्यंत संबंधित प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) किंवा लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्यालगत पडून असलेला दिशादर्शक फलक हटवावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. “अपघात झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.



