क्राईम

ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत नांदेडमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर मोठी कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड प्रतिनिधी / नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत विक्रीसाठी आणण्यात आलेल्या अवैध शस्त्रसाठ्यावर छापा टाकून तब्बल 703 घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपी फरार झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी ही कारवाई केली असून आरोपी म्हणून रणजितसिंघ रामसिंघ सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) याचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

दि. 22 मे 2026 रोजी पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करत असताना देना बँक ते सचखंड गुरुद्वारा मार्गावरील 300 सालाना शॉपिंग प्लाझामधील दुकान क्रमांक 08 मध्ये अवैधरित्या तलवारी, खंजीर व धारदार शस्त्रांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या उपस्थितीत पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला.

मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दुकान मालक रणजितसिंघ रामसिंघ सरदार हा घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. यात 470 तलवारी किंमत 12 लाख 31 हजार रुपये, 209 खंजीर व चाकू किंमत 1 लाख 70 हजार 900 रुपये तसेच 24 फायटर/पंच किंमत 2 हजार 400 रुपये असा एकूण 703 अवैध शस्त्रांचा 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या धाडसी कारवायांमुळे अवैध शस्त्र विक्री व बाळगणाऱ्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होत असल्याचे बोलले जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *