एआय-सारथी प्रकल्पाचा शुभारंभ; जिल्हा परिषद शिक्षकांना डिजिटल अध्यापनाचे प्रशिक्षण

नांदेड, दि. ५- जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक डिजिटल अध्यापन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या एआय-सारथी : डिजिटल अध्यापन व अनुभवाधारित शिक्षणासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचे क्षमता संवर्धन’ या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्कमाचा आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे शुभारंभ झाला.
विद्यापीठाच्या गणितशास्त्र संकुल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा परिषद, नांदेड यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विद्यापीठ आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्यात शालेय शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रमुख पाहुण्या मेघना कावली, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील तसेच आयआयएल संचालक डॉ. शैलेश वाधेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात आयक्यूएसीचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी एआय-सारथी प्रकल्पाची संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. शिक्षकांना भविष्योन्मुख कौशल्यांनी सुसज्ज करून शालेय शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी एआय आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि स्व-अध्ययनाची क्षमता विकसित करावी. आदिवासी व दुर्गम भागातील वाडी-तांड्यांपर्यंत ज्ञानाची डिजिटल गंगा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.
शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये एआय आधारित अध्यापनाचा व्यापक वापर होऊन शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. सन २०२६-२७ हे वर्ष जिल्हा परिषद शाळांसाठी एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे वर्ष ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर यांनी शिक्षणातील डिजिटल परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांचे सातत्यपूर्ण कौशल्यवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना एआय, डिजिटल अध्यापन साधने, आभासी प्रयोगशाळा, गणितीय सॉफ्टवेअर, वेब-आधारित शैक्षणिक संसाधने आणि अनुभवाधारित अध्यापन पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.



