जिला

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन

 

 

शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. ६- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदत आज शिवस्वराज्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि जनहितवादी प्रशासन व्यवस्थेचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच गुढीपूजन व गुढी उभारणी करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्‍यात आला. श्री चैतन्य इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी राहुल कर्डिले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आदर्श प्रशासन उभे केले. शेतकऱ्यांना मदत, सिंचन व्यवस्थेचा विकास, न्याय्य कारभार आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन यामुळे त्यांचे राज्य लोकाभिमुख ठरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या कामातून शिवरायांच्या प्रशासनाची मूल्ये जपली पाहिजेत, असेही ते म्‍हणाले.

कार्यक्रमात शाहीर रमेश गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडे व शाहिरी सादर करून उपस्थितांना शिवचरित्राची प्रेरणादायी आठवण करून दिली. उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक आणि जिल्हा परिषदेचा लोगो असलेला स्मृतिचिन्ह कप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तुबाकले यांनी केले. सूत्रसंचालन पद्माकर कुळकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी केले, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी मानले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करावी- मेघना कावली

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही लोककल्याण, न्याय, पारदर्शक प्रशासन, स्त्री सन्मान, पर्यावरण संवर्धन या मूल्यांवर आधारित होती, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले. आजच्या प्रशासन व्यवस्थेतही या मूल्यांचे महत्त्व कायम असून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जनतेच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे हीच शिवरायांना खरी आदरांजली- शहाजी उमाप

अनेक संकटांचा सामना करत छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी आणि न्यायाधिष्ठित राज्य उभे केले. आपल्या प्रजेवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी ते सदैव जागरूक राहिले. शासनाच्या माध्यमातून आपल्या वाट्याला आलेले कार्य प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडणे हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *