मराठवाडा

नांदेड विभागात आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागरूकता दिन साजरा

23 समपार फाटकांवर रस्ता वापरकर्त्यांचे समुपदेशन; चार लाख एसएमएस संदेशांद्वारे जनजागृती

आंतरराष्ट्रीय समपार जागरूकता दिन (ILCAD) 2026 निमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत दि. 09 जून 2026 रोजी रेल्वे समपार फाटकांचा वापर करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याबाबत रस्ता वापरकर्त्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यात आले. हे अभियान विभागातील संरक्षा, परिचालन, सुरक्षा बल (RPF), अभियांत्रिकी तसेच सिग्नल व दूरसंचार (S&T) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. नामनिर्देशित सर्व विभागांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेत रस्ता वापरकर्त्यांना रेल्वे समपार फाटकांवरील सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

मुदखेड–आदिलाबाद, परभणी–जालना, परभणी–गंगाखेड आणि जालना–छत्रपती संभाजीनगर या विभागांतील सुमारे 23 समपार फाटकांवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी रस्ता वापरकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून समपार फाटकांवरील सुरक्षितता नियमांचे उल्लंघन केल्यास उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी माहिती दिली. तसेच रेल्वे रुळ ओलांडण्यापूर्वी थांबा, दोन्ही बाजूंनी पाहा आणि मार्ग सुरक्षित असल्याची खात्री करूनच पुढे जा, असा संदेश देण्यात आला.

सुरक्षिततेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्यासाठी रस्ता वापरकर्ते व स्थानिक नागरिकांमध्ये माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. तसेच गावांमध्ये व समपार फाटकांवर ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवून रेल्वे रुळ व समपार फाटक ओलांडताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या खबरदारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समपार फाटकांवरील असुरक्षित वर्तनाचे गंभीर परिणाम अधोरेखित करणारी विशेष पथनाट्ये (नुक्कड नाटक) मुदखेड–बिंबरी, थेरबन–हदगाव रोड आणि हदगाव रोड–हिमायतनगर या विभागांतील अनुक्रमे एलसी क्रमांक 01,05 आणि 09 येथे सादर करण्यात आली.

या पथनाट्यांमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले तसेच महत्त्वपूर्ण सुरक्षा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात यश आले.
डिजिटल माध्यमातूनही व्यापक जनजागृती करण्यात आली. मराठवाडा परिसरातील रस्ता वापरकर्त्यांना समपार फाटकाजवळ पोहोचताना विशेष दक्षता बाळगावी व सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करणारे सुमारे चार लाख एसएमएस संदेश पाठविण्यात आले. या अभियानात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. सातत्यपूर्ण जनजागृती, शिक्षण आणि प्रसार उपक्रमांच्या माध्यमातून समपार फाटकांवरील अपघात रोखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षितता वाढविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *