जिला

जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आरोग्यदूत उपक्रम; ८०० शाळांतील १,५०० विद्यार्थी करणार जनजागृती – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

 

 

नांदेड, दि. ९- ग्रामीण भागात आरोग्य, स्वच्छता, कृषी व पशुसंवर्धन विषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थी आरोग्यदूत हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८०० शाळांमधील १ हजार ५०० विद्यार्थ्यांची आरोग्यदूत म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये तब्बल ९०० मुलींचा सहभाग आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. आरोग्य व विज्ञान विषयाची आवड असलेल्या इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शाळास्तरावरील चाचणीद्वारे निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतून किमान एक, तर मोठ्या शाळांमधून दोन विद्यार्थ्यांची आरोग्यदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष टी-शर्ट, ओळख बॅच तसेच विद्यार्थी आरोग्यदूत मार्गदर्शन पुस्तिका देण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून यापूर्वी समुदाय आरोग्य अधिकारी आणि शिक्षकांना प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्यदूत विद्यार्थी शाळा, कुटुंब आणि ग्रामपातळीवर आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्य करतील. आजारांपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय, प्राथमिक उपचार पेटीचा वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, घर व परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व याबाबत ते मार्गदर्शन करतील. याशिवाय कृषी विभागामार्फत रानभाज्यांचे पोषणमूल्य, शेतीतील फवारणीदरम्यान घ्यावयाची काळजी आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव प्राण्यांपासून होणारे आजार, रेबीज प्रतिबंध, जनावरांची निगा व पशू आरोग्य विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष विद्यार्थी आरोग्यदूत मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच जिल्हास्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी व शिक्षक अशा सुमारे एक हजार जणांना प्रशिक्षक म्हणून तयार करण्यात आले आहे. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दरमहा आढावा बैठक घेणार आहेत.

या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता, कृषी व पशुसंवर्धन विषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृतीची प्रभावी साखळी उभी राहून आरोग्यदायी व स्वच्छ गावांच्या निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्यक्त केला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *