जिला

जिल्ह्यात जलजीवन मिशन व जलसंधारण कामांचा सकारात्मक परिणाम; टँकरची संख्या ३२ वरून १४ वर

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रभावी नियोजन व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

 

नांदेड, दि.११- जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम यावर्षी स्पष्टपणे दिसून येत आहे. सन २०२४-२५ च्या उन्हाळ्यात जिल्ह्यात ३२ टँकरव्‍दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र सन २०२५-२६ मध्ये ही संख्या केवळ १४ वर आली असून प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि वेळेवर राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची प्रगती, जलसंधारण उपक्रम तसेच भूजल पुनर्भरणासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांचा नियमित आढावा घेण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.

भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी रिचार्ज शाफ्टची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच जी-रामजी अंतर्गत गावांमधील जुन्या बोअरवेल परिसरात जलतारा उपक्रम राबविण्यात येत असून भूजल पुनर्भरणाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता अधिक शाश्वत होण्यास मदत होणार आहे.

यापुढे जिल्ह्यात पाण्याची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत भूजल बळकटीकरण समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचे संवर्धन, रिचार्ज शाफ्ट उभारणी तसेच विविध जलसंधारण संरचनांच्या निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे. या उपाययोजनांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन भविष्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर दीर्घकालीन आणि शाश्वत तोडगा निघण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण आरोग्य सेवांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना नळ पाणीपुरवठा जोडणी देण्याचे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७० प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात ४० केंद्रांची निवड करण्यात आली असून त्यापैकी २० केंद्रांमध्ये काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यात यश येत आहे. परिणामी टँकरवरील अवलंबित्व कमी झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी संभाव्य एल-निनो परिस्थितीचा विचार करून प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. आगामी काळात जलजीवन मिशनच्या योजनांसोबतच शाश्वत भूजल बळकटीकरण समितीच्या माध्यमातून जिल्हाभर व्यापक जलसंधारण व भूजल पुनर्भरणाची कामे राबविण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *