मराठवाडा

२५ कोटींच्या अमृत भारत कामांत दर्जा आणि सुरक्षेचा बोजवारा?

मुदखेड रेल्वे स्थानकावरील प्रकाराने उपस्थित केले गंभीर प्रश्न

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी शेख इरफान / केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुदखेड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, स्थानक परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुदखेड स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून धावत असल्याने येथे सुरू असलेल्या विकासकामांमध्ये उच्च दर्जा आणि कडक सुरक्षा उपाययोजना अपेक्षित आहेत. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र याच्या विपरीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवासी करीत आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या सुरक्षा निरीक्षण दौऱ्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घाईघाईने रॅम्पचे काम करण्यात आले. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या टाइल्सचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजही त्या भागातून चालताना काही टाइल्स हलत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून गुणवत्तेचा अहवाल जाहीर करण्याची मागणी होत आहे.

याशिवाय, स्थानक परिसरात नवीन आराखड्यानुसार रुंद लोखंडी फुट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, १ जून रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सुरू असलेल्या कामाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे सुरक्षा बॅरिकेड्स किंवा सेफ्टी कॉर्डन उभारण्यात आले नसल्याचे दिसून आले. बांधकाम सुरू असतानाही त्याच मार्गाने प्रवाशांची ये-जा सुरू होती. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रेल्वेच्या सुरक्षा नियमांनुसार, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांभोवती सुरक्षा कुंपण, सूचना फलक, धोक्याच्या सूचना आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक मानले जाते. मात्र, मुदखेड स्थानकावर या नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही काही कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे निधीचा वापर, कामांची गुणवत्ता आणि कामांवर ठेवण्यात येणारे तांत्रिक नियंत्रण याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे प्रशासनाने संबंधित कामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मुदखेड हे नांदेड विभागातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथे प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड परवडणारी नाही. त्यामुळे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा, सुरक्षा नियमांचे पालन आणि निधीचा वापर यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिक, प्रवासी आणि रेल्वेप्रेमींकडून होत आहे.

प्रवाशांचा सवाल : “अमृत भारत योजनेतून स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा केला जात आहे; मात्र विकासकामांच्या नावाखाली जर निकृष्ट दर्जा आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?”

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *