शिक्षण

शाळा प्रवेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पहिल्याच दिवशी अधिकारी-कर्मचारी शाळांना देणार भेटी; नवोदित विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

 

नांदेड, दि. १२- उन्हाळी सुट्टीनंतर येत्या १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी शाळांना भेटी देऊन नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार आहेत. यावेळी शाळांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा तसेच शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी करण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुमारे ३ लाख १६ हजार पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे २६ हजार, तर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये जवळपास ६० हजार नवोदित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये रांगोळ्या, स्वागत कमानी, प्रभातफेरी, फुलांची उधळण तसेच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय आणि आनंददायी ठरावा यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतील विद्यार्थी आरोग्यदूत या अभिनव उपक्रमालाही प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आकर्षण व उत्साह निर्माण करणे, शाळेशी त्यांचे भावनिक नाते दृढ करणे आणि शिक्षणाचा आनंददायी अनुभव देणे हा प्रवेशोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे सीईओ मेघना कावली यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *