आरपीएफ नांदेडकडून रेल्वे डब्यातील आग लावण्याच्या घटनेचा १५ दिवसांत उलगडा; आरोपी अटकेत

दि. 27.05.2026 रोजी गाडी क्रमांक 17642 (नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेस) हिंगोली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आगमन झाल्यानंतर डबा क्रमांक SC-259288 (D-5) मधील शौचालयातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. आरपीएफचे कॉन्स्टेबल श्री व्ही. एम. शिंदे यांच्या सतर्कतेमुळे व तत्पर कारवाईमुळे अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग तात्काळ विझविण्यात आली व संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी रेल्वे अधिनियम, 1989 च्या कलम 153 अंतर्गत आरपीएफ पोस्ट, पूर्णा येथे गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू करण्यात आला.
विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, न्यायवैज्ञानिक (फॉरेन्सिक) सहाय्य घेण्यात आले तसेच दि. 01.06.2026 रोजी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नांदेड श्री दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. सातत्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही पडताळणी, गुप्त माहिती संकलन आणि क्षेत्रीय चौकशीच्या आधारे विशेष तपास पथकाने अवघ्या 15 दिवसांत या प्रकरणाचा यशस्वी उलगडा केला. दि. 11.06.2026 रोजी आरोपी मंगेश जाधव (वय 29 वर्षे), जि. वाशीम (महाराष्ट्र) यास ओळख पटवून अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीचा रेल्वे डब्याच्या शौचालयात आग लावण्याच्या घटनेशी थेट संबंध असल्याचे पुरेसे पुरावे आढळून आले. आरोपीस दि. 11.06.2026 रोजी पूर्णा येथील माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यास 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी (Magisterial Custody Remand) सुनावली आहे.
या प्रकरणाचा यशस्वी उलगडा हा आरपीएफ नांदेडच्या सतर्कता, व्यावसायिक कौशल्य आणि समन्वित कार्यपद्धतीचे द्योतक असून रेल्वे प्रवासी व रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफची कटिबद्धता अधोरेखित करतो.



