“ऑपरेशन अमानत” अंतर्गत आरपीएफ नांदेड विभागाने में-2026 पर्यत प्रवाशांचा 22.60 लाख किमतीचा हरवलेला माल/ सामान / वस्तू परत केला

रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभागाने ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत हरवलेल्या व बेवारस अवस्थेत आढळलेल्या प्रवाशांच्या मालमत्तेचा शोध घेऊन ती त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याची आपली प्रवासी सेवा व सुरक्षेबाबतची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
सन 2026 मध्ये मे महिन्यापर्यंत, नांदेड विभागातील आरपीएफने एकूण 67 प्रकरणांमध्ये हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती संबंधित प्रवाशांना यशस्वीरित्या परत केली. परत करण्यात आलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ₹22,60,286 /- इतकी आहे.
या मालमत्तेमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख रक्कम, हँडबॅग, प्रवासी सामान, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वैयक्तिक वस्तूंचा समावेश होता. रेल्वे प्रवासादरम्यान या वस्तू हरवणे, विसरणे किंवा चुकून मागे राहणे अशा विविध कारणांमुळे त्या प्रवाशांपासून दूर झाल्या होत्या. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्पर कार्यवाही, सखोल पडताळणी आणि समर्पित प्रयत्नांमुळे या सर्व वस्तू सुरक्षितपणे त्यांच्या वास्तविक मालकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.
‘ऑपरेशन अमानत’ ही रेल्वे सुरक्षा बलाची एक महत्त्वपूर्ण प्रवासी-केंद्रित योजना असून, रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेल्या वस्तूंची पुनर्प्राप्ती करून त्या संबंधित प्रवाशांना त्वरित परत मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय रेल्वेच्या विस्तृत जाळ्यावर सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवासी-अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या आरपीएफच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.
या उपक्रमांतर्गत मिळालेले सातत्यपूर्ण यश हे आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कता, व्यावसायिकता आणि कर्तव्यनिष्ठेचे द्योतक आहे. हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती प्रवाशांना परत देण्यामुळे संबंधित प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोच, शिवाय रेल्वे सुरक्षा बलाविषयीचा जनतेचा विश्वासही अधिक दृढ होतो.
प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या सामानाबाबत सतर्क राहावे तसेच कोणतीही वस्तू हरवल्यास किंवा बेवारस सामान आढळल्यास त्वरित जवळच्या आरपीएफ पोस्टशी संपर्क साधावा. तसेच रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 139 अथवा आरपीएफच्या अधिकृत सुरक्षा सहाय्य मंचांद्वारे माहिती देऊन तत्काळ मदत घ्यावी.
रेल्वे सुरक्षा बल, नांदेड विभाग प्रवाशांची सुरक्षा, संरक्षा आणि उत्कृष्ट सेवा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असून, रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवासी-अनुकूल बनविण्यासाठी भविष्यातही समर्पित भावनेने कार्यरत राहील.


