डॉ. सैयदा जफा अनाम यांनी एमबीबीएस शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले

नांदेड, दि. 13 जून : अल-रिजवान ज्युनिअर कॉलेज अँड ग्रुप ऑफ स्कूल्ससाठी अभिमानाची व आनंदाची बाब म्हणजे संस्थेची माजी गुणवंत विद्यार्थिनी डॉ. सैयदा जफा अनाम, सय्यद मतीनउल्लाह कादरी, यांनी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गोंदिया येथून एमबीबीएसचे शिक्षण उल्लेखनीय यशासह पूर्ण केले आहे.
याप्रसंगी अल-रिजवान ग्रुप ऑफ स्कूल्सचे संचालक अब्दुल रशीद सर तसेच प्राचार्या सैयदा तहसीन फातिमा यांनी डॉ. सैयदा जफा अनाम यांचा सत्कार करून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.
डॉ. सैयदा जफा अनाम यांनी एलकेजीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण अल-रिजवान इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण अल-रिजवान ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. तसेच त्यांनी नीट (NEET) परीक्षेची तयारीदेखील याच संस्थेत केली होती.
शैक्षणिक प्रवासात त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत दहावी, बारावी आणि नीट परीक्षेत टॉपर म्हणून यश संपादन केले. त्यानंतर गोंदिया येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून संस्थेचा गौरव वाढविला.
डॉ. सैयदा जफा अनाम यांचे हे यश मेहनत, जिद्द, सातत्य आणि गुणवत्तेचे प्रतीक असून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्थेच्या वतीने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या असून वैद्यकीय क्षेत्रात त्या आणखी यश संपादन करून समाजसेवा करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



