नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांसाठी ऑन द स्पॉट कृत्रिम अवयव वितरण शिबिरांचे आयोजन
२३ जूनपासून तालुकानिहाय दिव्यांग सहाय्यक साधन वितरण मोहीम

नांदेड, दि. २० जून- जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय व इतर सहाय्यक साधनांचा लाभ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत विशेष ऑन द स्पॉट शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. एसआर ट्रस्ट (अधिकृत फॅब्रिकेटिंग एजन्सी ऑफ अलिम्को, रतलाम) यांच्या सहकार्याने २३ जून ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही शिबिरे होणार आहेत.
शिबिरांमध्ये कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर्स, एएफओ (AFO), स्मार्ट बूट तसेच इतर आवश्यक सहाय्यक साधनांचे मोजमाप घेऊन लाभार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींनी आधार कार्ड, रेशन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र व यूडीआयडी (UDID) कार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :*
२३ जून रोजी मुदखेड येथे निवासी मूकबधिर विद्यालय, मुदखेड; २४ जून रोजी पंचायत समिती, अर्धापूर; २५ जून रोजी साईबाबा निवासी अपंग विद्यालय, तामसा रोड, हदगाव; २६ जून रोजी जिनियस इंग्लिश पब्लिक स्कूल, माहूर; २७ जून रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, किनवट; २८ जून रोजी हुतात्मा जयंतराव पाटील हायस्कूल, हिमायतनगर; २९ जून रोजी पंचायत समिती, भोकर; ३० जून रोजी सावित्रीबाई फुले निवासी मतिमंद विद्यालय, उमरी; १ जुलै रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, धर्माबाद;
२ जुलै रोजी पंचायत समिती, बिलोली; ३ जुलै रोजी निवासी अंध विद्यालय, देगलूर; ४ जुलै रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नरसी (ता. नायगाव); ५ जुलै रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, मुखेड; ६ जुलै रोजी पंचायत समिती, कंधार; ७ जुलै रोजी गतसाधन केंद्र, जिल्हा परिषद हायस्कूल, लोहा तसेच ८ जुलै रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, नांदेड येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सर्व शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहेत.
जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार यांनी केले आहे



