लोह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद; वाहतूक ठप्प, प्रवाशांची गैरसोय

लोहा, प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला लोहा शहरात शनिवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शहरातील बहुतांश व्यापारी आस्थापने बंद राहिली असून काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
बंददरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक थांबल्याने बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस अडकून पडल्या. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना तासन्तास बसस्थानकात थांबावे लागले, तर काहींना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मिळाली. — छायाचित्र : विनोद महाबळे.



