जिल्हा परिषदेत येत्या २८ जुलै रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

नांदेड, २४- जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक व कर्मचारी तसेच पुढील सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणारे शिक्षक व कर्मचारी यांच्या पेन्शनविषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये प्रलंबित पेन्शन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन शक्यतो त्याच ठिकाणी तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. विभागीय चौकशीमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन निश्चितीची प्रकरणे, वारसा हक्काची प्रकरणे तसेच इतर कारणांमुळे रखडलेली पेन्शन प्रकरणे यांचाही आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) राजकुमार मुक्कावार यांनी सेवानिवृत्त तसेच आगामी सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.



